पावसाळा सुरू झाला की सर्दी, खोकल्याबरोबरच पोटाचे विकारही वाढतात. अनेकांना पोटदुखी, अपचन, जुलाब, गॅसेस किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो. याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे पचनशक्ती कमी होणे. आयुर्वेदात या ऋतूमध्ये विशेष आहार-विहार पाळण्याचा सल्ला दिला आहे. योग्य काळजी घेतल्यास पोटाचे अनेक त्रास सहज टाळता येतात.
 
पावसाळ्यात पोटदुखी का होते?
 
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात आपली पाव्हण शक्ती मंदावते. त्यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही आणि विविध पचनविकार उद्भवतात.
 
पोटदुखीची प्रमुख कारणे:
  • मंदावलेली पचनशक्ती
  • दूषित पाणी किंवा अस्वच्छ अन्न
  • बाहेरील, तळलेले आणि मसालेदार पदार्थांचे सेवन
  • शिळे किंवा अर्धवट शिजलेले अन्न
  • अतिखाणे किंवा अनियमित वेळेवर जेवणे
  • थंड पेये आणि फास्ट फूडचे जास्त सेवन
  • पावसाळ्यात वाढणारे जंतुसंसर्ग
  • भूक नसताना , अजीर्ण झालेले असताना जेवणे
लक्षणे – 
पोटदुखीसोबत खालील लक्षणे दिसू शकतात:
  • पोटात कळा किंवा दुखणे
  • गॅसेस होणे व पोट फुगणे
  • मळमळ किंवा उलटी
  • भूक कमी लागणे
  • आंबट ढेकर येणे
  • जुलाब किंवा बद्धकोष्ठता किंवा आव पडणे 
  • जेवल्यानंतर पोट जड वाटणे
  • अशक्तपणा व थकवा
आयुर्वेदानुसार उपचार
आयुर्वेदात उपचार फक्त पोटदुखीवर नाही, तर त्यामागील कारणावर केले जातात. त्यामुळे प्रत्येक रुग्णाचा उपचार वेगळा असू शकतो.
उपचार सुरू करण्यापूर्वी अग्नी मंद असल्यामुळे लंघन करणे महत्त्वाचे असते. 
 
योग्य आहार
  • गरम, ताजे आणि सहज पचणारे अन्न खावे.
  • मूगडाळ खिचडी, पेज, सूप यांचा आहारात समावेश करावा.
  • कोमट किंवा उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
  • तळलेले, मसालेदार, जड आणि शिळे पदार्थ टाळावेत.
  • बाहेरचे उघड्यावरचे अन्न शक्यतो खाऊ नये.
  • जेवणापूर्वी आल्याचा छोटा तुकडा आणि सैंधव मीठ चावून खाणे. 
  • उकळून गार केलेल्या पाण्यात थोडा मध घालून पिणे.
  • कोमट पाण्याचे सेवन करावे.
  • भूक लागल्याशिवाय जेवू नये आणि अति खाणे टाळावे.
  • पुरेशी झोप घ्यावी . 
पावसाळ्यात पचनशक्ती कमी होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे या काळात आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य ऋतुचर्या, स्वच्छता आणि आयुर्वेदिक तत्त्वांनुसार आहार घेतल्यास पोटदुखी व इतर पचनविकारांपासून मोठ्या प्रमाणात बचाव करता येतो. लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हेच उत्तम आरोग्याचे रहस्य आहे.

Categories:

Tags:

Comments are closed