पंचकर्मामधील सर्वाधिक परिचित आणि प्रभावी चिकित्सा म्हणजे बस्ती. अनेक लोकांना बस्ती म्हणजेच संपूर्ण पंचकर्म असे वाटते. परंतु बस्ती ही पंचकर्मातील एक महत्त्वाची चिकित्सा पद्धती आहे. आज आपण बस्ती म्हणजे नेमके काय आणि तिचे फायदे काय आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया.
 
बस्ती म्हणजे काय?
 
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, गुदमार्गाद्वारे दिल्या जाणाऱ्या औषधाला बस्ती म्हणतात. बस्तीमध्ये कोणते औषध वापरले जाते यानुसार तिचे प्रकार ठरतात.
अनुवासन बस्ती – औषधी तेल किंवा तूप वापरून दिली जाणारी बस्ती.
निरूह (आस्थापन) बस्ती – औषधी काढा, मध, सैंधव इत्यादींच्या मिश्रणाने दिली जाणारी बस्ती.
 
आयुर्वेदात बस्तीला “अर्ध चिकित्सा” असे संबोधले आहे, कारण ती अनेक प्रकारच्या रोगांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरते.
 
बस्ती चिकित्सा कोणासाठी उपयुक्त आहे?
 
बस्ती विशेषतः वातदोषाशी संबंधित विकारांमध्ये लाभदायक मानली जाते. 
◦वाताचे विविध विकार – गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, संधिवात, सांधेदुखी इत्यादी.
◦हाडे व सांध्यांच्या झिजेमुळे निर्माण होणाऱ्या तक्रारी.
◦स्त्रियांचे विकार – अनियमित मासिक पाळी, पाळीच्या वेळी होणारे दुखणे, कमी किंवा जास्त रक्तस्राव, गर्भाशयाशी संबंधित काही तक्रारी. 
◦नियमित पोट साफ न होणे किंवा बद्धकोष्ठता.
◦मूत्रविकार – लघवी करताना होणारी वेदना, अडथळा निर्माण होणे, काही मूत्राशयाचे विकार.
◦शरीरशुद्धी, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आणि शरीराला बळ देणे.
 
बस्ती चिकित्सा कधी करावी?
 
आयुर्वेदानुसार वर्षा ऋतू (पावसाळा) हा बस्ती चिकित्सेसाठी विशेष अनुकूल काळ मानला जातो. या काळात वातदोषाचा प्रकोप वाढण्याची शक्यता असते आणि बस्ती त्याचे शमन करण्यास मदत करते.
 
तथापि, रुग्णाची प्रकृती, ऋतू आणि आजार यांचा विचार करून तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने बस्ती चिकित्सा वर्षातील कोणत्याही काळात केली जाऊ शकते.
 
बस्ती देण्यापूर्वी काय केले जाते?
 
बस्ती देण्यापूर्वी काही पूर्वकर्मे केली जातात. 
1.संपूर्ण शरीराला औषधी तेलाने अभ्यंग (मालिश) केला जातो.
2.त्यानंतर स्वेदन (वाफ) दिली जाते.
3.या प्रक्रियेमुळे शरीरातील दोष सैल होऊन योग्य मार्गाने बाहेर पडण्यास मदत होते.
4.त्यानंतर वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार तेलाची किंवा काढ्याची बस्ती दिली जाते.
 
बस्ती किती दिवस करावी?
 
बस्ती चिकित्सेचा कालावधी रुग्णाच्या आजार, प्रकृती आणि उद्दिष्टानुसार ठरवला जातो. साधारणतः ७ दिवसांपासून ३० दिवसांपर्यंत विविध प्रकारच्या बस्ती योजना केल्या जातात.
 
लवकरच पावसाळा सुरू होत आहे. हा काळ बस्ती चिकित्सेसाठी विशेष उपयुक्त मानला जातो. योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसार बस्ती चिकित्सा  करून शरीरशुद्धी, वातशमन आणि आरोग्य संवर्धनाचा लाभ घेता येऊ शकतो.

Categories:

Tags:

Comments are closed