
आयुर्वेदिक पद्धतीने काय खावे, काय टाळावे?
नवरात्र म्हणजे भक्ती, उत्साह आणि देवीच्या आराधनेचा काळ. देवीच्या सेवेत आणि उत्सवाच्या आनंदात हे नऊ दिवस कसे निघून जातात, ते कळतही नाही.
नवरात्रीत अनेक जण उपवास करतात. काही जण पूर्ण उपवास करतात, काही फक्त फळे घेतात, तर काही जण उपवासाच्या नावाखाली साबुदाणा वडा, बटाट्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ आणि गोड पदार्थांचा भरपूर आस्वाद घेतात.
नऊ दिवसांसाठी नऊ रंगांचे कपडे असतात, तसेच आता नऊ दिवसांसाठी नवनवीन उपवासाचे पदार्थही केले जातात. पण प्रश्न असा आहे की
उपवास असा कसा करावा की त्रास कमी आणि फायदा जास्त?
चला, हे आयुर्वेदाच्या दृष्टीने समजून घेऊया.
नवरात्रीचा उपवास आयुर्वेदाच्या दृष्टीने का महत्त्वाचा?
नवरात्र साधारणतः वर्षा ऋतूनंतर येणाऱ्या शरद ऋतूच्या सुरुवातीच्या काळात येते.
वर्षा ऋतूमध्ये शरीरातील अग्नी काही प्रमाणात मंदावलेला असतो. त्यानंतर शरद ऋतूमध्ये शरीरातील पित्ताचा प्रकोप होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच या काळात आहार-विहारात योग्य बदल करून पित्ताला अनुकूल अशी दिनचर्या ठेवणे महत्त्वाचे ठरते.
यामध्ये हलका, सहज पचणारा आणि मर्यादित आहार घेणे शरीराला फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे उपवास हा केवळ धार्मिक आचरण न राहता, योग्य पद्धतीने केला तर आहारातील शिस्त राखण्याची एक संधी ठरू शकतो.
पण इथे एक महत्त्वाची गोष्ट
उपवास करायचा की नाही यापेक्षा, उपवास कसा करायचा हे अधिक महत्त्वाचे
प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, वय, कामाचे स्वरूप, पचनशक्ती आणि आरोग्य वेगळे असते. त्यामुळे उपवास म्हणजे दिवसभर उपाशी राहणे किंवा फक्त उपवासाचे पदार्थ भरपूर खाणे, असा अर्थ नाही.
हे खावे
१. फळे
फळे हा उपवासासाठी सोपा आणि हलका पर्याय आहे.
डाळिंब हे सर्वांकरिता उत्तम फळ.
पेरू, सफरचंद, अंजीर , पपई, मोसंबी यांसारखी फळे आपल्या प्रकृतीनुसार घेता येतात.
पित्त प्रकृती असणाऱ्यांनी अतिशय आंबट फळांचे सेवन मर्यादित ठेवावे.
फळांचा रस घेण्यापेक्षा शक्यतो संपूर्ण फळ खाणे अधिक चांगले.
२. उपवासाचे पदार्थ
राजगिरा हा उपवासातील पौष्टिक पर्याय आहे.
राजगिऱ्याची भाकरी, थालीपीठ किंवा लाडू असे पदार्थ घेता येतात. मात्र लाडूमध्ये साखर किंवा गूळ आणि तूप यांचे प्रमाण जास्त असल्यास तो पौष्टिक असला तरी अति सेवन टाळावे.
शिंगाड्याचे थालीपीठ किंवा इतर घरगुती, कमी तेलात केलेले पदार्थही घेता येतात.
३. दही
दही काही व्यक्तींना चांगले मानवते; मात्र आयुर्वेदानुसार दही गुरु आणि अभिष्यंदी मानले जाते आणि पित्त वाढवू शकते.
म्हणून ज्यांना दही चांगले पचते त्यांनी ते दुपारच्या वेळी आणि मर्यादित प्रमाणात घ्यावे. प्रकृतीनुसार त्यात थोडी खडीसाखर वापरता येते.
हे प्यावे
१. पाणी
तहान लागेल तसे पाणी प्यावे. उपवासाच्या दिवशीही शरीराला पुरेसे द्रव मिळणे महत्त्वाचे आहे.
धणे-जिऱ्याचे पाणी योग्य प्रमाणात घेता येते.
२. शहाळ्याचे पाणी
शहाळ्याचे पाणी हा नैसर्गिक द्रवपदार्थ असून, उपवासाच्या दिवशी योग्य पर्याय ठरू शकतो.
३. कोकम सरबत
कोकमाचे सरबतही ताजेतवाने करणारे ठरू शकते. मात्र त्यामध्ये साखर किंवा गूळ जास्त प्रमाणात वापरू नये.
४. ताक
ताजे ताक दुपारच्या वेळी साधारण एक वाटी घेता येते.
मात्र ज्यांना ताक किंवा आंबट पदार्थांचा त्रास होतो त्यांनी ते टाळावे.
हे टाळावे
उपवास म्हणजे तळलेले पदार्थ खाण्याची मुभा नाही.
साबुदाणा वडा, बटाट्याचे वडे, तळलेले बटाटे, चिप्स, फराळी चिवडा यांसारखे पदार्थ वारंवार आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास उपवास हलका न राहता उलट जड होऊ शकतो.
जास्त तळलेले, तेलकट, अतिगोड आणि अतिखारट पदार्थ टाळा.
तसेच दिवसभर काहीही न खाता संध्याकाळी एकदम भरपूर खाणेही टाळावे.
उपवासात झोपही महत्त्वाची
उपवास व्यवस्थित पचावा आणि शरीराला त्याचा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर
- दिवसा दीर्घकाळ झोपणे टाळावे.
- रात्री उशिरापर्यंत जागरण करू नये.
- शरीराला पुरेशी रात्रीची झोप द्यावी.
- उपवासाच्या दिवशी अतिश्रम टाळून आपल्या क्षमतेनुसार काम करावे.
उपवास, जागरण आणि कमी आहार यामुळे शरीरावर अनावश्यक ताण येऊ शकतो.
म्हणून उपवास करताना शरीराचे संकेत ऐकणे महत्त्वाचे आहे.
नवरात्री म्हणजे फक्त देवीची आराधना करणाय बरोबर स्वतःच्या शरीराची आणि मनाचीही काळजी घेण्याची ही एक सुंदर संधी आहे.कारण उपवासाचा खरा अर्थ ‘उपाशी राहणे’ नसून, योग्य आहार-विहारातून स्वतःच्या चांगल्या आरोग्याच्या जवळ जाणे हा आहे.

Comments are closed