
वसंत ऋतु हा उबदारपणा, ओलावा आणि मूर्त कोमलतेचा ऋतू मानला जातो. वसंत ऋतु हा वातावरणातील वाढलेल्या ओलाव्याचा प्रतीक आहे, आणि तो या काळातील लागवडीच्या उत्पत्तीसाठी (कल्टीवेशनसाठी) देखील गरजेचा आहे. आयुर्वेदाच्या प्राचीन शास्त्रानुसार काही वैशिष्ट्ये आहेत जी कफ दोषाशी वसंत ऋतु संरेखित करतात. आयुर्वेदातील सिद्धांतानुसार समानाने समानाची वृद्धी होते त्यामुळे वसंत ऋतुत शरीरात कफ दोष वाढतो.
ज्याप्रमाणे वसंत ऋतूतील सुर्याचा किरणांमुळे बर्फ वितळतो, त्याचप्रमाणे ते शरीरातील संचित कफाचे द्रवीकरण करतात जेणेकरून तो कफ शरीरातून काढून टाकला जाऊ शकतो. ही प्रक्रिया शरीरासाठी पुनरुज्जीवित आणि डिटॉक्सिफिकेशन करणारी आहे, परंतु काहींसाठी ती अनेक आरोग्यविषयक चिंतांना कारणीभूत ठरते.
वसंत ऋतूत जास्त प्रमाणात दिसणारे व्याधी जसे दमा, सायनुसायटिस, ब्राँकायटिस, सर्दी, खोकला, श्वासकष्टता (श्वसन विकार) या रोगांची लक्षणे दिसतात.
तीव्र व्यायाम केल्यानंतर किंवा नाक चोंदल्यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्यांचे सौम्य स्वरूप अनुभवणे सामान्य आहे. परंतु काही वेळा, श्वासोच्छवासाचा त्रास कायम राहतो आणि पूर्णपणे श्वास घेण्याच्या क्षमतेत व्यत्यय आणू शकतो. सतत श्वास घेण्यास त्रास होणे हे अंतर्निहित ( underlying pathalogy) वैद्यकीय परिस्थितीची उपस्थिती दर्शवू शकते जसे की
● ब्राँकायटिस
ब्राँकायटिस, विशेषतः तीव्र ब्राँकायटिस, एक सामान्य आणि गंभीर श्वास समस्या आहे. जेव्हा श्वासनलिका (फुफ्फुसात हवा वाहून नेणारे पॅसेजेस) सूजतात तेव्हा ते उद्भवते ज्यामुळे श्लेष्मा जमा होतो. छाती भरून आल्या प्रमाणे वाटने, खोकल्यामध्ये पिवळा/हिरवा कफ दिसणे आणि श्वास लागणे यासारखी लक्षणे सतत दिसल्यास, ब्राँकायटिस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
● दमा
दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो; इंफ्लामेटरी श्वसन रोगामुळे वायुमार्गाच्या अस्तरांना सूज येते ज्यामुळे फुफ्फुसात प्रवेश करणाऱ्या हवेचे प्रमाण मर्यादित होते. दम्याचे एकच कारण नाही, आनुवंशिकता, ऍलर्जी आणि त्रासदायक घटकांचा संपर्क आणि बालपणात व्हायरल इन्फेक्शन यांसारख्या अनेक घटकांमुळे दमा होण्याचा धोका वाढतो.बहुतेक प्रकरणांमध्ये, सूक्ष्मकण आणि दुषीत वायुजन्य त्रास आणि तीव्र शारीरिक हालचाल यासारख्या ऍलर्जीमुळे दम्याचा अटॅक येऊ शकतो.
● सायनुसायटिस
सायनुसायटिस तेव्हा होतो जेव्हा सायनसेसचा इंटरनल लाइनिंग ला सूज येते किंवा अनेक प्रकारचे सायनस आहेत त्या मध्ये कफाचा संचय होतो व त्यामुळे त्यांना सूज येते. बहुतेक प्रकरणांमध्ये, या स्थितीमुळे अनुनासिक अडथळा, अनुनासिक क्षेत्रामध्ये परिपूर्णतेची भावना, चेहर्यावरील दाब आणि खोकला येतो.सायनुसायटिसच्या काही सामान्य कारणांमध्ये सामान्य सर्दी, नाकातील पॉलीप्स आणि रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता यांचा समावेश होतो.
वसंत ऋतूत मनुष्याचे शारिरीकबल हे मध्यम प्रमाणात असते.याकरिता काय काळजी घ्यावी हा विचार प्रत्येकाचा मनात असतो त्यासंबंधी माहिती घेऊया.
आयुर्वेदा मध्ये अनेक आचार्यानी त्यांचामते वसंतऋतूत काय योग्य व काय अयोग्य यांचे वर्णन केलेले आढळते.ते आपण समजून घेऊया
● पथ्य आहार
आचार्यांनी लघु (हलके) व सहज पचणारे जसे बार्ली, गहू, मांसाहार,तिखट, कडू, कषाय रसात्मक व उष्ण, अद्रव ( सॉलीड) या स्वरूपातील अन्न जसे यव ( बार्ली), मूग यांचा वापर करण्यास सांगितले आहे. मध, मद्य प्रकारातील सिधू, माध्वीका, पेय पदार्थांमध्ये श्रृंगबेराम्बु( शुंठी सिध्द जल), मध्वाम्बु( मध + पाणी), जलदम्बु ( मुस्ता+ पाणी), साराम्बु ( शीतद्रव्य + जल) या गोष्टींच सेवन करण्यास सांगितले आहे.
● पथ्यविहार
व्यायाम हा सर्वतोमते वसंत ऋतुमध्ये आचरण्यात आणावा असे सांगितले आहे. व्यायामातले सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, पायी चालणे, प्राणायाम असे प्रकार यांचा अभ्यास वसंत ऋतूत करावा.
● अपथ्य आहार
आचार्यांनी स्निग्ध, अम्ल व मधुर रसात्मक द्रव्य, अतिप्रमाणात द्रव आहार, दही, पचण्यास जड असलेले आहारीय पदार्थ वर्ज्य करण्यास सांगितले आहे.
● अपथ्य विहार
सर्वानूमते दिवास्वाप करू नये असे आचार्यांचे म्हणणे आहे.
आयुर्वेदात या काळात वृद्ध झालेल्या कफाचे शोधन (शरीरातून बाहेर काढण्यासाठी) पंचकर्म करण्याचे प्रयोजन करण्यास सांगितले आहे.
त्या अंतर्गत
- वमन- स्वस्थ असणाऱ्या व्यक्तीकरिता व रोगी असणाऱ्यांकिरता सुद्धा हे पंचकर्म शरीरातील अतिरिक्त कफाला काढून टाकण्यासाठी व शरीराच्या होमिओस्टॅसिसची देखभाल करण्यासाठी करावे.
- शिरोविरेचन/ नस्य हे पंचकर्म शिरोभागातील जत्रुउर्ध्वप्रदेशातील कफाचेशोधन करण्यासाठी करावे.
- बस्ती या पंचकर्माचे प्रयोजन प्रकृतीनुसार करण्यास सांगितले आहे.
- या सोबतच उद्वर्तन, नस्य, वमन, लेप ( शीतद्रव्यांचा), कवल, गण्डूष, अंजन, धूमपान या पंचकर्मांचा अवलंब करण्यास सांगितला आहे.
- वैद्यांचा मार्गदर्शनाने हरितकी चूर्णाचे मधासह चाटण करावे.
लाईफ स्टाईल डिसोर्डर हे आताच्या काळात खूपप्रमाणात दिसून येते, प्रत्येक ऋतूत काही आहार-विहार पथ्य-अपथ्य( रेजिमेन) न पाळल्यामुळे यात वाढ होताना दिसते.शरीरातील क्रियांचा योग्य होमियोस्टेसिस राखण्यासाठी, आचार्यांनी ऋतू प्रमाणे वर्णन केलेल्या पथ्य-अपथ्य आहार-विहारचे अवलंब प्रत्येक ऋतूत केला जावा. वसंत ऋतू ( मार्च १५- मे १५) या आदानकाळात म्हणजेच चैत्र व वैशाख मासामध्ये या ऋतू चे परिणाम असतात. कफदोषाची अधिक प्रमाणात वृद्धी वसंत ऋतू मध्ये असते म्हणून वमन हे पंचकर्म स्वस्थ व्यक्तीने व रोगी व्यक्तीने प्रकृती परीक्षण करुन करावे. वसंत ऋतूत पित्तदोषाचे देखिल शमन होते, हा ऋतु शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखणयासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
तर ह्या ऋतुमुळे होणाऱ्या रोगांना घाबरून न जाता योग्य निदान, औषधोपचार, पंचकर्म, योग मार्गदर्शन घ्या आणि त्यांना कायमचा निरोप आयुर्वेदाच्या औषधोपचारांनी द्या.

Comments are closed