
आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव म्हणजे त्वचा. शरीराचे संरक्षण करणे, सौंदर्य वाढवणे तसेच एकूण आरोग्याचे प्रतिबिंब दाखवणे हे त्वचेचे महत्त्वाचे कार्य आहे. स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकालाच आपली त्वचा निरोगी, स्वच्छ व तेजस्वी असावी असे वाटते. मात्र आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे त्वचाविकारांचे प्रमाण वाढत चालले आहे.
त्वचाविकारांमध्ये तरुण वयात येणारे पिंपल्स, वांग, शीतपित्त, कुष्ठ, वारंवार होणारे फंगल इन्फेक्शन इत्यादी अनेक विकारांचा समावेश होतो. आयुर्वेदात त्वचाविकारांमागील कारणे, लक्षणे व त्यावरील चिकित्सा यांचा सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे.
त्वचाविकारांची कारणे
१) आहारातील दोष:
आयुर्वेदानुसार त्वचाविकार होण्यामागे आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः विरुद्ध आहार हे मुख्य कारण मानले जाते. उदाहरणार्थ –
•दूध व जेवण एकत्र घेणे
•दूध व भात किंवा दूध व फळे एकत्र खाणे
•तिखट, खारट व आंबट पदार्थांचे अतिसेवन
•जेवणावर वरून मीठ घेणे
•दही, गूळ व नवीन अन्न यांचे अतिसेवन
•पनीर व इतर दुग्धजन्य पदार्थ (मिठाई इ.) यांचे जास्त प्रमाणात सेवन
२) विहारातील दोष:
अपुरी झोप, रात्री जागरण, दिवसा झोप घेणे, अतिताणतणाव, राग, चिंता, तसेच उलटी येत असताना ती अडवून धरणे — या सर्व गोष्टी त्वचाविकारांना कारणीभूत ठरतात.
चिकित्सा
१) पंचकर्म उपचार:
त्वचाविकारांमध्ये पंचकर्माला विशेष महत्त्व आहे.
•वमन, विरेचन ,रक्तमोक्षण सारखे पंचकर्म वारंवार करून दोष निर्हरण करून घेणे ही चिकित्साची पहिली पायरी आहे.
योग्य पंचकर्म उपचार केल्यास रोगाच्या मुळावर उपचार होऊन लवकर व टिकाऊ लाभ मिळतो.
२) औषधोपचार:
वैद्यांनी केलेल्या निदानानुसार आयुर्वेदिक औषधोपचार केले जातात. विविध प्रकारचे काढे, तूप, लेप व औषधी यांचा वापर यामध्ये केला जातो.
३) पथ्य-अपथ्य:
हलकासा व पचायला सोपा आहार घ्यावा. तेलकट, तिखट व जंक फूड टाळावे. खारट, आंबट व आंबवलेले पदार्थ कमी किंवा टाळावेत.
४) त्वचेची नियमित काळजी:
नियमित अभ्यंग करणे, त्वचेच्या प्रकारानुसार लेप, तेल इत्यादींचा वापर नियमितपणे करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा निरोगी व तेजस्वी राहण्यास मदत होते.
त्वचाविकार हे केवळ बाह्य सौंदर्याशी संबंधित नसून ते शरीरातील दोषदुष्टीचे द्योतक असतात. योग्य आहार-विहार, आयुर्वेदिक चिकित्सा व वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले उपचार यांमुळे त्वचा निरोगी व तेजस्वी ठेवणे निश्चितच शक्य आहे.

Comments are closed