
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!”
“नको ओ, त्यात किती शुगर असते!”
असे म्हणत काकांनी तीळाची वडी बाजूला ठेवली आणि चहासोबत मारी बिस्किटांवर ताव मारला. आता काकांना कोण सांगणार की तीळाच्या वडीमधील तीळ आणि गुळाचे मिश्रण हे मारी बिस्किटांमधील साखरेपेक्षा कैक पटींनी अधिक पोषक आणि आरोग्यदायी आहे.
“मी शुगर-फ्री बिस्किट खातोय ओ!”
आता ‘शुगर-फ्री’ या नावाखाली बाजारात नेमके काय खपवले जाते, हा वेगळाच विषय आहे. तरीसुद्धा संक्रांतीच्या काळात तीळाची वडी खाणे आयुर्वेदाच्या दृष्टीने आरोग्यासाठी अत्यंत उत्तम मानले जाते.
आयुर्वेदशास्त्रानुसार मकरसंक्रांतीचा कालावधी हा हेमंत ऋतूचा उत्तरार्ध असून, वातावरणातील थंडी आणि रुक्षतेमुळे या काळात वातदोष प्रकर्षाने वाढतो. वातदोष वाढल्याने सांधेदुखी, त्वचेचा कोरडेपणा तसेच थकवा जाणवतो. तीळ हा उष्णवीर्य, स्निग्ध व गुरू गुणांचा असून तो मुख्यतः वातशामक आहे. तो शरीराला बळ देतो, अस्थिधातूचे पोषण करतो व सांध्यांना आवश्यक स्निग्धता प्रदान करतो.
गूळ हा अग्निदीपक म्हणजेच पचनशक्ती वाढवणारा, पथ्यकारक व रक्तशुद्धी करणारा मानला जातो. तो शरीरातील आमदोष कमी करतो तसेच थंडीमुळे होणारा कफसंचय टाळण्यास मदत करतो. त्यामुळे संक्रांतीच्या काळात तीळ व गुळाचे एकत्र सेवन हे ऋतुसात्म्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. हा आहार केवळ ऊर्जा देणारा नसून शरीरातील दोषांचे संतुलन राखणारा आहे.
बदलत्या जीवनशैलीत आणि कृत्रिम ‘शुगर-फ्री’ पर्यायांच्या मोहात आपण नैसर्गिक व ऋतुनुसार आहाराकडे दुर्लक्ष करतो. असे न करता आपल्या भारतीय संस्कृतीतील सण आणि त्यानुसार ठरवलेला आहार याविषयी जागरूक राहून त्याचे आचरण करणे आवश्यक आहे. म्हणूनच संक्रांतीच्या काळात योग्य प्रमाणात तीळ आणि गुळाचे सेवन सर्वांनी अवश्य करावे.

Comments are closed